(श्रीहरीकोटा)
भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वीपणे पार पाडून एक नवा इतिहास रचला आहे. आता यानंतर देशाची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही पुढील कित्येक मोहिमांवर काम करत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य मोहीम लाँच झाली आहे. त्यासोबतच गगनयान मोहिमेची तयारीही जोरात सुरू आहे. या सगळ्यातच इस्रोने आणखी एका चांद्र मोहिमेचे संकेत दिले आहेत.
इस्रोच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-३ नंतर आता इस्रो आणखी एका चांद्र मोहिमेवर काम करत आहे. भारताच्या आतापर्यंतच्या चांद्र मोहिमा एकतर्फी होत्या. मात्र, आता चंद्रावरुन नमुने घेऊन परत पृथ्वीवर येण्यास सक्षम असणा-या यानावर इस्रो काम करत आहे. या मोहिमेसाठी इस्रोने अद्याप कोणतीही डेडलाईन निश्चित केली नाही. तसेच याची तयारी कुठपर्यंत आली आहे, याबाबत देखील या अधिका-याने माहिती दिली नाही. विक्रम लँडरने केलेले हॉप एक्सपेरिमेंट ही याच मोहिमेसाठीची चाचणी होती. ती यशस्वी झाल्यामुळे आता इस्रो मोठ्या स्तरावर काम करत आहे.
३ सप्टेंबर रोजी इस्रोने विक्रम लँडरचे पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केले होते. इस्रोने कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरने आपले इंजिन सुरू केले आणि स्वत:ला सुमारे ४० सेंटीमीटर उंचीपर्यंत वर उचलले. सोबतच तेवढेच अंतर पुढे जात पुन्हा एकदा विक्रमने सॉफ्ट लँडिंग केले होते.
इस्रो भविष्यात जपानसोबत देखील एक चांद्र मोहीम राबवणार आहे. लूनार पोलर एक्सप्लोरेशन असे या मोहिमेचे नाव असणार आहे. चंद्रावर पाण्याचा आणि अन्य खनिजांचा शोध घेण्यासाठी ही संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे.