पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पाचव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘X’ सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या आपल्या नागरिकांना परत येण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे. आम्ही परदेशात आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत.”
एस. जयशंकर यांच्या पोस्टवर, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ज्या भारतीय नागरिकांनी नोंदणी केली आहे त्यांना आज (गुरुवार, 12 ऑक्टोबर) विशेष फ्लाइटसाठी मेल केले गेले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी इतर नोंदणीकृत लोकांना संदेश पाठवला जाईल.
Launching #OperationAjay to facilitate the return from Israel of our citizens who wish to return.
Special charter flights and other arrangements being put in place.
Fully committed to the safety and well-being of our nationals abroad.
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) October 11, 2023
वृत्तसंस्था पीटीआयने मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्या हवाल्याने सांगितले की, इस्रायलमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत. शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. या काळात हमासने घुसखोरी करून सर्वसामान्यांना लक्ष्य केले होते. यानंतर इस्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इस्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचवेळी हमासही इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागत आहे.