(मुंबई)
मुंबईतील विलेपार्ले येथील बाल्कनीचा भाग कोसळल्याने दाम्पत्याचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारात ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मिरवणूक जात होती. परंतु, मिरणवूक पुढे सरकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रॉबिन रॉकी मिस्किटा (वय, ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय,६५) अशी मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयाच्या शेजारी असणाऱ्या रस्त्यावरून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक जात होती. याचवेळी बाल्कनीचा काही भाग कोसळला. ही गर्दी पुढे सरकल्याने अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले. यात रॉबिन आणि प्रशिला यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.