(मुंबई)
सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा सुकाळ आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड होत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. यावेळी त्यांनी हर हर महादेव,वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांच्या निर्मात्यांवर घणाघाती टीका करत, या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाचा विपर्यास होत असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत राजेंनी याबाबत भाष्य केले आहे.
…तर गाठ माझ्याशी आहे
वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरुनही संभाजीराजे छत्रपती यांनी निशाणा साधला आहे. या चित्रपटातील मावळ्यांच्या पोशाखावरुन संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे. चांगले चित्रपट केले तर मी स्वतः दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला तयार आहे. पण इतिहासाची मोडतोड केली तर गाठ माझ्याशी आहे, असा थेट इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या चित्रपटांची अशा पद्धतीने मोडतोड होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपल्याला हवा तसा इतिहास वळवता येत नाही. इतिहासाचा गाभा सोडून कसे काय जाऊ शकतात, असा थेट सवालही संभाजीराजेंनी चित्रपट निर्मात्यांना केले आहे.
सेन्सॉर बोर्डात एक ऐतिहासिक समिती नेमावी
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण तो वाचत नाही, ही आपली देखील चूक आहे. त्यामुळेच काही लोक महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करुन आपल्यासमोर मांडतात. त्यामुळेच सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी एक समिती नेमावी, अशी मी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती करतो, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी म्हटले आहे.