(मुंबई)
महाराष्ट्रात इतके विलक्षण लोक जन्माला आले. पण आपण त्या सर्वांना जातीत अडकवले आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला, तर इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी आतापर्यंत पाहिला नाही, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला असून, सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या आठवणी, विचार मोकळेपणाने मांडले. तसेच राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करीत नाराजी जाहीर केली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची ओळख आहे. पण महात्मा ज्योतीराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह इतके संत, साहित्यिक, क्रांतीकारक आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि ही माती विचारांनी सुपिक केली. पण आम्ही त्यांना जातीमध्ये बांधत आहोत. हे मराठ्यांचे, हे दलितांचे, हे मावळ्यांचे! इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
ही माणसं सर्वांची असून आपण त्यांना व त्यांचे विचार सर्वदूर पोहोचवले पाहिजे. पण त्याऐवजी आपण हे आमचे असून यांचे नाव तुम्ही घ्यायचे नाही, लिहायचं नाही असे सांगत असतो. काहींना यातून आनंद मिळतो, तर काहींना राजकीय फायदे मिळतात, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.