(देवरू़ख / सुरेश सप्रे)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, साडवली आणि अखील भारतीय फार्मसी शिक्षक संघटना (APTI) शाखा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचे उद्दघाटन प्रमुख पाहुणे डॉ. नितीन देवरे, सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, माजी राज्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष रविंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले. उद्दघाटन प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, APTI, महाराष्ट्रचे अध्यक्ष व डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी, नवी मुंबईचे प्राचार्य, डॉ. राकेश सोमाणी, डॉ. रेमेथ डायस, डॉ. मनीष कुमार गुप्ता, डॉ. अमोल खाडे, डॉ. सुजित नगरे व APTI मुंबई शाखेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संस्था अध्यक्ष रविंद्र माने यांनी फार्मसी कॉलेज साडवली च्या १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीकडे प्रकाशझोत टाकला.
सदर परिसंवादासाठी डॉ. नितीन देवरे (सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य), डॉ. रेमेथ डायस (प्राध्यापक, कॉलेज ऑफ फार्मसी, कराड) आणि डॉ. मनीष कुमार गुप्ता (प्राध्यापक, जयपूर नॅशनल विदयापीठ, जयपूर) यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या परिसंवादात देशातील २० हुन अधिक महाविद्यालयातील 300 फार्मसीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी व शिक्षकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी त्यांची संशोधने पोस्टर आणि ओरल प्रेझेटेशनच्या माध्यमातून सादर केली. सदर प्रेझेटेशनचे परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयाने गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील २० हुन अधिक प्राध्यापकांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते.
परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमात उत्कृष्ठ पोस्टर आणि ओरल प्रेझेटेशन सादर करणाऱ्या १२ विद्यार्थी व शिक्षकांना प्रशास्तिपत्रके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, प्राध्यापक डॉ. सुजित नगरे, APTI मुंबई शाखेचे पदाधिकारी, इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी साडवली महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.