(मुंबई)
केंद्रातील भाजप सरकारविरोधातील विरोधकांच्या ’इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. दोन दिवसांच्या ‘इंडिया’च्या कार्यक्रमात प्रत्यक्ष बैठक केवळ चार तासच होणार आहे, बाकी डिनर पार्ट्याच होणार असल्याचे समजते. यासाठी ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलातील 175 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचे भाडेच सुमारे 21 लाख रुपये आहे. या बैठकीला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याही उपस्थित राहणार आहेत.
‘इंडिया’च्या मुंबईतल्या बैठकीचे यजमानपद शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे. गेले महिनाभर या बैठकीसाठी ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते तयारीला लागले होते. महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेही या बैठकीच्या नियोजनाच्या कामी लागले होते. कारण काँग्रेसचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणार्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे.
ग्रँड हयात या सांताक्रूझ येथील पंचतारांकित हॉटेलात इंडियाच्या नेत्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध राज्यांतून 60 ते 65 नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या हॉटेलच्या 175 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सुसज्ज रुमचे एका दिवसाचे साधारण किमान भाडे 15 ते 20 हजारांच्या घरात आहे. या नेत्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यात येणार आहे. दोन दिवस डिनर पार्ट्या, महाराष्ट्रीय स्पेशल मेन्यू आदि रेलचेल असेल.
शिवसेना ठाकरे गटाकडून 31 ऑगस्टला डिनरचे आयोजन करण्यात आले, तर 1 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून नेत्यांच्या लंचचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजनात प्रत्यक्ष बैठक 1 सप्टेंबर रोजी केवळ चार तास असणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांचे समन्वय करण्याबाबत समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती अकरा जणांची असेल असे सांगितले जाते. “इंडिया” लोगोचे अनावरण यावेळी होणार आहे. इंडिया आघाडीचा जाहीरनामा कसा असेल या संदर्भातही बैठकीत चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.
असा असेल कार्यक्रम
30 ऑगस्ट – दुपारी 4 – पत्रकार परिषद
31 ऑगस्ट – सायंकाळी 6 – नेत्यांचे स्वागत, सायंकाळी 6.30 नंतर – इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण आणि अनौपचारिक बैठक, रात्री 8 – डिनर
1 सप्टेंबर – सकाळी 10 वाजता – नेत्यांचे ग्रुप फोटोसेशन, सकाळी 10 ते दुपारी 2 – बैठक, दुपारी 2 – लंच, दुपारी 3.30 – पत्रकार परिषद
जुलैमध्ये बंगळुरूतील दुसऱ्या बैठकीत आघाडीचे नाव निश्चित करण्यात आले. आता मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीमुळे विरोधकांमधील जवळीक वाढण्यास आणखी हातभार लागेल. देशातील राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. ती निवडणूक आता अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे.