आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 25व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 157 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
टॉस गमावल्यानंतर लंकन संघाने पहिला गोलंदाजी केली आणि आपल्या भेदक मा-याने इंग्लिश संघाला अवघ्या 156 गुंडाळले. त्यानंतर पथुम निसांका (नाबाद 77) आणि सदीरा समरविक्रमा (नाबाद 65) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 25.4 षटकात 160 धावा करून श्रीलंकेने विजयावर शिक्कामोर्तब केला. समरविक्रमा आणि निसांका यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 137 धावांची विजयी भागीदारी झाली.
या सामन्यात श्रीलंकेच्या मोठ्या विजयानंतर विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या विजयासह श्रीलंकेने विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ 2023 च्या विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे.
वास्तविक, इंग्लंडविरुद्ध नेत्रदीपक विजयानंतर, श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत फायदा झाला. श्रीलंकेचा संघ पाकिस्तान संघाच्या स्थानावर म्हणजेच पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पाकिस्तान संघाचे नुकसान झाले. पाकिस्तान संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे.
या पराभवानंतर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. इंग्लिश संघाच्या खात्यात 5 सामन्यांनंतर फक्त एक विजय आणि 4 पराभव आहेत. यादरम्यान त्याचे 2 गुण आहेत. जर इंग्लंडला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, परंतु तरीही त्यांना अंतिम 4 गाठणे फार कठीण आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानचा 8-० असा पराभव केला आहे. त्याचबरोबर इंग्लंडला गेल्या पाच विश्वचषकांमध्ये श्रीलंकेवर मात करता आलेली नाही. याशिवाय यावेळी विश्वचषकात इंग्लंडच्या नावावर एक अतिशय लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
विश्वचषकातील शेवटच्या 5 सामन्यांमध्ये इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
2007 – श्रीलंका 2 धावांनी विजयी
2011 – श्रीलंका 10 गडी राखून विजयी
2015 – श्रीलंका 9 गडी राखून विजयी
2019 – श्रीलंका 20 धावांनी विजयी
2023 – श्रीलंका 8 गडी राखून जिंकला*
इंग्लंड संघात तीन बदल
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने संघात तीन बदल केले आहेत. रीस टोपली, हॅरी ब्रूक आणि गस ऍटिंकसन या सामन्यात खेळणार नाहीत. ख्रिस वोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन परतले आहेत. त्याचबरोबर अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमरा यांचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंड संघ :
जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
श्रीलंका संघ :
पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महिष तिक्षना, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.