मराठा समाजाला मिळणारे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केल्यानंतर सदर आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकरा सदस्यांची कमिटी तयार करून संपुर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या तरुण- तरुणींचे खचलेले मनोधैर्य वाढवून समाजामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी भाजपा संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून आपली मराठा आरक्षणाबाबतची सकारात्मक भूमिका समाजापुढे मांडत आहे. आमदार प्रसाद लाड हे या कमिटी मध्ये असून त्यांच्यावर कोकणची जबाबदारी देण्यात आली असल्याने तिन दिवस ते कोकण दौर्यावर असून त्यामध्ये त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील मराठा समाजातील तरूण, प्रतिष्ठित व्यक्ती यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपा सरकारकडून देवेंद्रजी फडणवीस यांनी नियोजनबद्ध सकारात्मक निर्णय घेऊन यशस्वी केले होते. मात्र सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. आता पक्षीय राजकारण बाजुला ठेवून आपणा सर्व मराठा समाजाला पुन्हा हा लढा उभा करायचा असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने लागेल ते सहकार्य मी करेन अशी ग्वाही आ.प्रसाद लाड यांनी दिली. यावेळी राज्यातील भविष्यातील नोकर भरतीत मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाचे संगमेश्वर तालुक्यातील नेते विकास सुर्वे तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी श्री लाड यांचे या भूमिकेबद्दल कौतुक करत आरक्षणासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. क्षत्रिय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण संबंधी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विनय नातू, भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, विकास सुर्वे, तालुका सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, रूपेश कदम उपस्थित होते. या बैठकीला तालुक्यातील मराठा समाजातील सर्व पक्षीय लोक उपस्थित होते.