रत्नागिरी : आस्था सोशल फाऊंडेशन, रत्नागिरी या संस्थेकडून ‘तृतीयपंथी’ या समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकाला मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेकडून या समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आस्था सोशल फाऊंडेशन, रत्नागिरी हि संस्था मागील बारा वर्षे दिव्यांगांसाठी कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील आस्थाचे कार्य चालूच आहे हे आपण जाणता. दिव्यांगांप्रमाणेच समाजातील अत्यंत दुर्लक्षित व वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी. दुर्दैवाने कोरोनाच्या आव्हानात्मक काळात देखील अद्यापहि शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या वर्गाला झाली नाही. सन्मानाने जगण्याची इच्छा असूनही कोणीही काम देत नाही, बँका कर्ज देत नाही, राहण्यासाठी हक्काचे घर नाही, सामाजाकडून तुच्छ वागणूक मिळते त्यामुळे नाईलाजाने “मंगती” करून लाचारीचे जगणे जगावे लगत आहे. महिला धोरणात, शासन निर्णयात तृतीयपंथी यांच्या कल्याणा बाबत शासनाकडून सूचना असून देखील प्रत्यक्ष त्यांच्या पर्यंत काहीच पोहचत नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांचे नेतृत्व करणारी पल्लवी शर्मिला माने यांना आस्थाच्या प्रयत्नाने जिल्हा स्तरीय दिव्यांग सुलभ निवडणूक सनियंत्रण समितीवर घेण्यात आले. सर्वांचे ओळखपत्र तयार करून त्यात तृतीयपंथी (Third Gender) अशी ओळख अद्ययावत करण्यात आली, आणि सुरु झाला त्यांच्या हक्क मिळविण्याचा प्रवास.
कोरोना काळात रेल्वे, आठवडा बाजार, बाजारपेठ बंद असल्यामुळे अतिशय बिकट परीस्थित असलेल्या या तृतीयपंथ्याना आस्थाच्या माध्यमातून आज प्रधान टी यांच्याकडून किराणा सामानाची किट व देणगीदार कृपाली बिडये यांच्या कडून प्रत्येकी १०००/- रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू आज या ठिकाणी पल्लवी माने, महेश्वरी लोहार, अक्षय शेट्ये, प्रमोद तांबे यांना देण्यात आल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आस्था परिवाराला असे वाटते कि तृतीयपंथी या घटकाला देखील आपले विचार मांडण्यासाठी आपले हक्काचे विचारपीठ मिळावे, त्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला आस्थाच्यावतीने श्रीम. सुरेखा पाथरे, श्री. संकेत चाळके, श्री कल्पेश साखरकर, श्रीम. संपदा कांबळे. व प्रधान टी च्या वतीने श्रीम. खतीजा प्रधान, श्रीम. श्रुती बागवे. हे उपस्थित होते.