(रत्नागिरी)
आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी, विवांत अनटेम्ड अर्थ फौंडेशन आणि कोस्टल कॉन्सरवेशन ग्रुप आयोजित पहिल्या सागर महोत्सवात आज वाळूशिल्प प्रदर्शन आणि समुद्रकिनारा व खारफुटी जंगल सफरींचे आयोजन केले. या सर्व उपक्रमांना शेकडो पर्यटक, विद्यार्थी, जिज्ञासू व्यक्तींसह रत्नागिरीकरांनी सहभाग घेतला. रविवारीसुद्धा या सहली, सफरींचे आयोजन केले आहे. त्यातही रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेण्याचे आवाहन आसमंत फाउंडेशनने केले आहे.
भाट्ये समुद्रकिनारी वाळूशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन भाट्ये गावच्या सरपंच प्रीती पराग भाटकर यांनी केले. वाळूशिल्प पाहण्यासाठी दिवसभरात शेकडो विद्यार्थी, पर्यटक, रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती. समुद्राचे रक्षण, समुद्री कासवाचे संवर्धन, सैनिकांप्रती कृतज्ञता, गानकोकिळा लतादिदी मंगेशकर, जगभरात भारताचा नावलौकिक वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित वाळूशिल्पे साकारण्यात आली आहेत.
कार्यक्रमाकरिता फिनोलेक्स कंपनी व सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. वाळूशिल्प प्रदर्शन, समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची अभ्यासपूर्ण सफर असे विविध कार्यक्रम झाले. आज झालेले सफरीचे कार्यक्रम उद्या रविवारी (ता. २२) होणार आहेत, इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आसमंतचे संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे.