(मुंबई)
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी यंदा जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळं प्रशासनानं चोख नियोजन करावं, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसंच, वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या अनुषंगानं तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पालखी मार्गासह वारीत येणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागू नये यासाठी पोलीस विभागानं स्टिकर्स किंवा पासेसच्या माध्यमातून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये असं नियोजन करावं. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठीच्या निधीत १० कोटींची आणि ग्रामपंचायतींसाठी ५० लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद करण्यात आहे. याशिवाय रस्त्यांसाठीही वेगळा निधी दिला आहे. त्यामुळं रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घ्या. वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
पालख्यांच्या प्रस्थानापूर्वीच वारीसाठीची सर्व सज्जता ठेवा. यंदा वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष नियोजन करावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असं चोख नियोजन करा. विभागातील आजूबाजूच्या महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणाचीही मदत घ्या. वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली याची काळजी घ्या. वैद्यकीय पथके त्यातील तज्ज्ञ आणि रुग्णवाहिका यांचीही सज्जता ठेवा. औषधे, पिण्याचे पाणी, अन्य आरोग्य सुविधा याबाबत वेळीच नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या