(सोलापूर)
वारकरी, विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा आज गुरुवारी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही २ लाखावर भाविक उभे आहेत.
पाऊस, वारा, उन्हाचा चटका बसू नये म्हणून दर्शन रांगेट शेडनेटची सावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक भक्तीत तल्लीन असल्याचे चित्र दिसून येते. आषाढी एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागी वाळवंट फुलले आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत भक्तीरसाने न्हावून निघत आहेत. मंदिर समितीच्यावतीने वॉटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आली आहे. पत्राशेड येथे कायमस्वरुपी ४ तर तात्पुरते ६ असे १० दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. तसेच भाविकांसाठी खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
पंढरपुरात आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला.
आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. विठ्ठलाची महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब व मानाचे वारकरी काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी आज २९ जून रोजी पहाटे ३.१८ वाजता सुरू होत ३० जून रोजी दुपारी २.४२ वाजता समाप्त होईल.
पंढरपुरात काल दाखल होताच मुख्यमंत्री शिंदे हातात टाळ घेऊन विठुरायाच्या गजरात तल्लीन झाल्याचे दिसले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासोबत सोलापुरातील संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते पंढरपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुगडीचा फेर धरून वारीचा आनंद लुटला. मुख्यमंत्री यांच्यासोबत शिवसेना नेते भरत गोगावले आणि आमदार शहाजीबापू पाटील हे देखील पंढरपुरात उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे.
२९ जून रोजी सकाळी ११ वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात मुख्यमंत्री उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबिराची पाहणी करतील दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथून पुन्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील .
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
१९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते. त्यांच्यासोबत हे वारकरी दांपत्य उपस्थित असतं. हे मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे मंदिर समितीला असतो. विठ्ठलाची पूजा ही पहाटे पार पडते. त्यावेळी मुख्यमंत्री मंदिरात दाखल झाले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पूजेची तयारी सुरू होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा झाल्यानंतर विठूरायाचे मुखदर्शन बंद ठेवण्यात येते. पण यंदा महापूजेचा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच भाविकांना विठूरायाचे मुखदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे हजारो वारकऱ्यांना विठ्ठलाचे महापूजेनंतरचे तेजस्वी रुप पाहता आले.
यावेळी दर्शन रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या दांपत्याला हा मान मिळतो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल, त्यांना पूजेसाठी बोलावलं जातं. शिवाय मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कारही केला जातो.
बळीराजाला चांगले दिवस येण्याचे साकडे
यावेळी मुख्यमंत्र्यांनी यंदा ‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे,’ असे साकडे विठ्ठलाला घातले. ‘यंदा मला सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. गतवर्षी सरकार स्थापन करून मी विठ्ठलाच्या महापूजेला आलो होतो. विठ्ठलाच्या कृपेने राज्यात सर्वकाही सुरुळीत सुरू असून, सरकार लवकरच आपले 1 वर्ष पूर्ण करणार आहे,’ असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.