(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था आयोजित आषाढी एकादशी निमित्त जाकादेवी ते चाफे महाविद्यालयाच्या राधाकृष्ण मंदिरापर्यंत वारकरी वेशात पायी वारी करत विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला.
खालगांव- जाकादेवी मंदिरापासून ते चाफे महाविद्यालयापर्यंत सुमारे पाच किलोमीटर अंतर पायी चालत विद्यार्थ्यांनी या वारीची रंगत अधिकच वाढवली.नव्या पिढीला भक्तिमार्गाबरोबरच संतांच्या कार्याची महती, सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीची जाणीव करून देणे, त्याचबरोबर सामाजिक सलोखा,विश्वबंधुत्व, पर्यावरण यांविषयी जाणीव जागृती होण्याच्या उद्देशाने या वारीमध्ये प्रबोधनात्मक घोषवाक्य, संतांची सुवचने, अभंग, किर्तन तसेच विठू माऊलीचा जयघोष करीत ही वारी शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. टाळ मृदंग, लेझीम तसेच रींगण, फुगड्या आणि विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी विद्यार्थी संतांच्या अभंगात अक्षरशः रंगून गेले.
विठ्ठल रखुमाईसह वारकरी वेशात वाद्यासह काढलेल्या दिंडीने अनेकांना आकर्षित केले.या वारीचे नेतृत्व मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेने केले होते. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार उर्फ काका साळवी, संस्थेचे सचिव व युवा नेते रोहित मयेकर, कोषाध्यक्ष ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले, श्रीमती दीप्ती मयेकर, श्रीमती शिरिषा मयेकर, प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी , मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, उपसरपंच कैलास खेडेकर, प्रतिक देसाई, बंड्या देसाई, बंटी सुर्वे ,पोलीस बीट अंमलदार किशोर जोशी यांसह परिसरातील शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, परिसरातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते, भाविक, सेवाभावी नागरिक, तरूण, तरूणी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.या धार्मिक वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या जाकादेवी-चाफे परिसरातील विद्यार्थी व भाविक वर्गाला मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेतर्फे धन्यवाद देण्यात आले.