आषाढाच्या पहिल्या दिवशी
स्मरुया कालिदास !
शतशः नमन माझे
त्यांच्या काव्यप्रतिभेस !!
देवशयनी आषाढी
म्हणूनही आषाढ प्रसिद्ध !
गुरुपौर्णिमेला गुरूंचा
लाभत असे वरदहस्त !!
आला आषाढ आषाढ
वाट माहेराची दिसे !
ज्याने निर्मिली ही रूढी
त्याला नमस्कार असे !!
अशा आषाढ महिन्यात
चहूकडे हिरवळ !
सृजनाचा आविष्कार
नव्हाळीचा परिमळ !!
बेत करुनी भजींचा
द्यावा आषाढा निरोप !
पुन्हा येऊन पुढल्या वर्षी
आमचा वाढवी हुरूप !!
ऋतुजा उमेश कुळकर्णी, रत्नागिरी
मो.9822983959
आषाढ सरी
अल्लड भारी आषाढ सरी
मेघ सावळा कधी गर्जतो
अवचित चपला कडकड करी
शेतामधुनी पिके हिरवी
वाऱ्यावरती डोलत बसती
खूश होउनी गवतफुलेही
पर्णामधुनी हळूच हसती
गर्द सावळ्या मेघांनाही
पळवत नेतो अवखळ वारा
अंबरातली घन रांगोळी
विस्कटून हा करी पसारा
डोंगरातुनी शुभ्र दुधाच्या
धुंद नाचती प्रपात धारा
छान गालिचा हिरवाईचा
खिल्लारांना मिळतो चारा
सणासुदीच्या दिवसांमध्ये
साज चढविते सृष्टी सारी
आषाढीला मनापासुनी
भक्त करिती पंढरी वारी
मुग्धा कुळये, रत्नागिरी
आला आषाढ आषाढ
जणू रांजण पाण्याचे,कुणी ओती भुईवरी||
भूमी झाली न्हाती धुती,करी हिरवा शिणगार
तिच्या लावण्यास कुणी, नको लावाया नजर||
बळीराजा सुखावला, पीकपाणी भरा आलं
धरतीमायेच्या कृपेनं, घरदार सुखावलं||
आषाढात प्रथमदिनी,कालीदासा आठवावे
‘मेघदूत’ ते वाचोनी, डोळ्यांमध्ये साठवावे||
आषाढीला होई दाटी, वारकरी पंढरीत
वाट पाही विठुराया कटी ठेवूनिया हात||
येते आषाढी पौर्णिमा,करू गुरूला वंदन
करी अज्ञान तो दूर, घाली ज्ञानाचे अंजन||
गुरूंचे ही गुरू व्यास,सा-या विश्वाचा विश्वास
महाभारत, पुराणे, देती शिकवण खास||
अशा लाडक्या आषाढा,महिमा वर्णू किती तुझा
दर वर्षास येऊनी, जीव शांत करी माझा||
—————————————
अनुराधा दीक्षित,वाडा देवगड.
आषाढस्य प्रथम दिवसे….
कालीदासा आद्यकवी तू वंदन तुजला करते.. ध्रु.
विद्येसाठी तुला हिणवता घोर तपास आचरले
तपश्चर्येने कालीमातेला प्रसन्न करून घेतले
साहित्यातील नवरसांनी लेखणी तुझी मग झरते.1
रघूवंश अन कुमारसंभव काव्य अजोड लिहीले
शाकुंतल अन मेघदूत हे अनुपम जगात ठरले
तुझे ग्रंथ साहित्य संपदा जग माथ्यावर धरते.. 2
तुझ्या नायिका सौंदर्य वर्णने कल्पनाविलास भारी
निसर्गवर्णन करण्यात तुझा तर हात कुणी ना धरी
काव्यपिठाचा एकमेव तू कुलगुरू हे जग म्हणते.3
तुझाच उत्सव असतो आषाढाच्या पहिल्या दिवशी
तुलाच स्मरण्यास इथे बरसती शब्दसुरांच्या राशी
वरदहस्त लाभू दे तुझा अन सरस्वती वरदान ते.4
सौ सुनेत्रा विजय जोशी, रत्नागिरी
मोबाईल 9860049826
आषाढी
भेटे तिथे पंढरीला , विठोबा सावळा .. ।। धृ ।।
भजनात रंगतो
किर्तनात नाचूनी गातो
भक्तीगीत ऐके माझा , विठोबा सावळा .. ।। १ ।।
अमृताची गोडी मिळे
मनी मिळो विसावा
भक्तीत आनंद त्याच्या , विठोबा सावळा.. ।। २ ।।
साजिरी ही रखुमाई
सोबतीला तुझ्या येई
कटेवरी हात घेई , विठोबा सावळा … ।। ३ ।।
सौ. मनिषा पटवर्धन