(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीत आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. माजी आमदार बाळ माने यांच्यासह माजी मंत्री अनंत गीते यांनी शासनाकडून न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेतल्याने हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सामान्य शेतकऱ्यांच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नसल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त करण्यात आल्या.
सोमवारपासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबा, काजू बागायतदारांचे आंदोलन सुरू होते. करबुडे येथील आंबा बागायतदार शेतकरी रामचंद्र मोहिते यांनी तर यावेळी आमरण उपोषण पुकारले होते. इतर बागायतदारांनी त्याला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. उपोषणाच्या माध्यमातून आमची रास्त मागणी ऐकून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील, अशी अपेक्षा होती, पण गेल्या आठवडाभरात या बागायतदार शेतकऱ्यांची बाजू कुणीही ऐकून घेण्यास पुढे सरसावले नव्हते. येत्या हिवाळी अधिवेशनात तरी शासनाकडून न्याय मिळेल, येथील स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत हा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा या आंदोलनकर्त्या बागायतदार, शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली होती. पण लोकप्रतिनिधींनीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी या आंदोलनकर्त्यांची बाजू शासनदरबारी निकाली निघावी, यासाठी माजी आमदार बाळ माने, माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावली. त्यावेळी बागायतदार संघटनेचे प्रकाश साळवी, टी. एस. घवाळी, परशुराम कदम, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी आदींची उपस्थिती होती. बागायतदारांच्या या प्रश्नी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना (उबाठा गट) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी माजी जि. प. सदस्य उदय बने यांनी संपर्क साधला. गीते व दानवे यांनी बागायतदारांच्या या आंदोलनाची दखल घेत शासनाकडून योग्य निर्णय घेण्यासाठी चर्चा केली जाईल, असे आश्वासित केले. तर माजी आमदार बाळ माने यांनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून हा प्रश्न धसास लावण्याचा शब्द बागायतदारांना दिला आहे.