(नवी दिल्ली)
आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. २८ सप्टेबर ते ८ ऑक्टोबर यादरम्यान स्पर्धा रंगणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यंदा भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. विश्वचषकामुळे बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात होणा-या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याचदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी १५ जणांच्या चमूची निवड केली आहे. या संघाचे कर्णधारपद युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये मागील काही वर्षांपासून दमदार कामगिरी करणा-या काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, जितेश शर्मा, प्रभसिमरन यांच्याशिवाय अन्य युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्णधारपदाची चर्चा होत असलेल्या शिखर धवन याला संघातदेखील आपली जागा बनवण्यात अपयश आले.
दरम्यान, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ मैदानात उतरणार आहे. स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघ उपविजेता ठरला होता.
भारतीय संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर)