राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार तर क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार येणार आहेत.
राज्यात कोरोनाचे मोठे संकट आहे. रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात भरतीची प्रक्रिया होणार आहे. भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून भरतीचे आदेश लवकरच निघतील, अशी माहिती आहे.
यापूर्वी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता 50 टक्के भरतीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. राज्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबावावी अशी मागणी केली होती. येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, त्यामुळे क आणि ड वर्गातील कर्मचारी वाढतील, अशी आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागातील एकूण 16 हजार पदांची भरती लवकरच होणार आहे.