(रत्नागिरी)
निळाशार समुद्राच्या लाटांचे विहंगम दृश्य ७० फूट उंचावरून पाहण्याचा निर्भेळ आनंद पर्यटकांना मिळावा, यासाठी कोकणातील पहिला ‘झिप-लाईन’ प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे या प्रसिद्ध पर्यटनस्थळी साकारण्यात आला आहे.
रत्नदुर्ग माउंटेनिअरिंगच्या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्याची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. १४०० फूट लांबीच्या अंतरावर झिपलाईनला लटकत अवकाशातून विहार करत जाण्याचा अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार असून, कोकणातील हा पहिलाच प्रयोग आहे. प्रसिद्ध गणपतीपुळे तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मार्गावर आरे-वारे खाडी आणि किनाऱ्यावरील डोंगरावरील पर्यटन स्पॉट पर्यटकांच्या पसंतीस पडलेला आहे. हंगामामध्ये हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. याच ठिकाणी खाडीच्या किनाऱ्यापासून डोंगरावर १४०० फूट लांबीचा रोप बांधण्यात आला आहे. किनाऱ्यापासून ७० फूट उंचीवर हा रोप राहील, अशी तजवीज केली आहे. आकाशामध्ये लटकत समुद्राच्या लाटांसह निसर्गाचा निर्भेळ आनंद लुटण्याची संधी, या झिपलाइनमुळे पर्यटकांना मिळणार आहे.
रत्नदुर्गच्या सदस्यांनी याची चाचणी घेतली. विविध वजनाच्या व्यक्ती उंचावरून किनाऱ्याकडे झिपद्वारे पाठवण्यात आले. किनाऱ्याकडून जमिनीवर सुटलेला थंडगार वारा, समुद्राचे पाणी खाडीकडे जातानाचे विहंगम दृश्य पाहताना अंगावर रोमांच येतो. आरे-वारेतील हा प्रकल्प येत्या काही दिवसांत पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे रत्नदुर्गतर्फे सांगण्यात आले. रत्नागिरीत पाहण्यासाठी किनारे, मंदिर वगळता अॅडव्हेंचर असे नसल्यामुळे अनेक पर्यटक मुक्काम करत नाहीत. अशा प्रकल्पांमुळे पर्यटक येथेच राहील आणि त्यामधून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. हाच उद्देश लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी आरे-वारे येथे झिपलाईन प्रकल्प राबवण्यासाठी पावले उचलली होती. डेहराडून येथील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सर्व्हेक्षणही झाले होते. राधाकृष्णन यांच्या बदलीनंतर प्रकल्पाचे काम थांबले. कालांतराने रत्नदुर्ग माउंटेनिअरिंगचे सदस्य गणेश चौगुले, जितेंद्र शिंदे, दिनेश जैन यांनी पुढाकार घेत प्रकल्पाला चालना दिली. त्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, किरण सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
सुरक्षिततेबाबत चोख व्यवस्था
उंचावरून झिपलाइनचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांची विशेष सुरक्षा घेतली जाते. यासाठी लोखंडी रोपचा वापर केला आहे. त्याला स्टिल रोप म्हणतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दोन रोप लावलेले असतात. त्यामुळे पर्यटक सुरक्षित राहू शकतो.
पर्यटन व्यावसायाला चालना
पर्यटनवृद्धीसाठी आरे-वारे बिचवर झिपलाइनचा प्रकल्प राबवला जात आहे. त्याचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले असून, लवकरच तो पर्यटकांना खुला करण्यात येईल. यामुळे पर्यटन व्यावसायाला चालना मिळू शकते.
– वीरेंद्र वणजू, रत्नदुर्ग माउंटेनिअरिंग.