(रत्नागिरी)
क्रीडाक्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षकांना राज्य शासनातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रत्नागिरीच्या खो-खोपटू आरती कांबळे व अपेक्षा सुतार यांना सोमवारी (ता. २८) राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे रत्नागिरीतील क्रीडाक्षेत्राची मान उंचावली असून, दोघींवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे बालेवाडी, महाळुंगे येथील क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉलमध्ये झाला. या वेळी राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसेपाटील, संजय बनसोडे यांच्यासह अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिवछत्रपती पुरस्कार विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडून, प्रशिक्षक, मार्गदर्शकांना देऊन गौरवण्यात आले. रत्नागिरीतील उत्कृष्ट खो-खो पटू म्हणून आरती कांबळे व अपेक्षा सुतार या दोघींनी राज्य, राष्ट्रीय पातळीसह आशियाई स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्यात योगदान दिले आहे.
रत्नागिरीच्या या दोन्ही खेळाडूंना मागील दहा ते पंधरा वर्ष प्रशिक्षक म्हणून पंकज चवंडे यांनी प्रशिक्षण दिले आहे. रत्नागिरीच्या या दोन्ही खो-खो खेळाडूंना एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.