मराठा समाजास आरक्षणाची गरज नाही असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं आज मराठा समाजाला देण्यात आलेला आरक्षण कायदा रद्द केलं आहे.या निर्णयाच्या विरोधात पंढरपुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही बांधवांनी अर्धनग्न होऊन सरकार विरोधात रोष व्यक्त करीत सामुहिक मुंडण आंदोलन केलं.
महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे.राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे.सरकार आरक्षणाच्यावतीने बाजू कमी पडल्याचा आरोप पंढरपुरातील समाज बांधवांनी केला आहे.यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही मंत्री, आमदार, खासदार यांच्या गाड्या फोडू, असा इशारा दिला,आमच्या ५६ मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले अनेक युवक तुरुंगात आहेत,आणि सरकार गप्प आहे,हा आमच्यावर मोठा अन्याय असून आम्ही याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे.
आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सकाळ पासूनच मराठा समाजातील कार्यकर्ते व आरक्षण प्रश्नांवर लढा देणारे क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पंढरपुरात दाखल झाले होते.निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल म्हणून काही कार्यकर्त्यांनी जल्लोशाची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी निकाल विरोधात केल्याची माहिती मिळताच त्याच कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब मारुन आंदोलन केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम तातडीने दाखल झाले. आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, स्वागत कदम, शशिकांत पाटील, धनाजी साखळकर, संदीप मुटकूळे, संतोष कवडे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार खासदारांना रस्त्यावरुन फिर देणार नाही
सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मुंडण आंदोलन केले. राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार खासदारांना रस्त्यावरुन फिर देणार नाही. प्रसंगी त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला.
राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार
न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. न्यायालयात मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यास राज्यसरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची एकमुखी मागणी आहे.जो पर्यंत आरक्षण दिले जात नाही तो पर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज पासून राज्यभर आंदोलन सुरु केले जाणार आहे, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला.*
सोलापुरातील मराठा समाज आक्रमक; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द केले. या निषेधार्थ सोलापुरातील काही मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र आंदोलनस्थळी पोहोचताच आंदोलनकर्त्यांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी माऊली पवार यांनी सरकार व कोर्टाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धिक्कार असो…धिक्कार असो राज्य व केंद्र शासनाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजीही माऊली पवार यांनी केली.