रत्नागिरी : महाआघाडीच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण दुरावले आहे. याची जबाबदारी महाआघाडी शासनाचीच आहे. ओबीसी समाजाला आरक्षण प्राप्त होईपर्यंत भाजपा आक्रमक राहत हा लढा चालू ठेवेल. ओबीसीच्या मोर्चामध्येही भाजपचे अनेक पदाधिकारी मोर्चेकरी म्हणून सहभागी झाले होते. भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे सदैव उभी आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. जिल्हा भाजपाच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा भाजपाच्या बैठकीला सर्व सदस्य उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अधांतरी पडला आहे. ओबीसींना बरोबर घेत त्यांचे प्रश्न हिरीरीने मांडणार आहोत. मोर्चामध्ये भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. फार पूर्वीपासून भाजपमध्ये ओबीसी समाजाचे नेते कार्यरत आहेत. ओबीसींचे आरक्षण जाण्यास राज्यातील सरकारच जबाबदार आहे. हे प्रश्न भाजपाच सोडवेल, असा विश्वास अॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यात या जिल्ह्यात झालेले कार्यक्रम, आगामी कार्यक्रम, पक्ष प्रवेशासंदर्भात धोरण, विकास निधी संदर्भात अपेक्षा याबाबत तसेच येऊ घातलेल्या निवडणुका त्याबाबत तयारी याची माहिती अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
व्यासपीठावर जिल्हा संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, प्रभारी तथा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, अॅड. बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, अॅड. विलास पाटणे उपस्थित होते. शैलेंद्र दळवी यांनी संघटनात्मक जबाबदारी संघटना शिस्त याबाबत उद्बोधन केले. प्रमुख मार्गदर्शक आमदार प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांना दिशा देणारे, प्रेरणादायी मार्गदर्शन खास शैलीत केले.
महाआघाडी शासनाने निर्माण केली अराजकता या बाबत ठराव ज्येष्ठ नेते विलास पाटणे यांनी मांडला. देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळे यांनी अनुमोदन दिले. अॅड. बाबा परुळेकर यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी शासनाचा निषेध प्रस्ताव मांडला. त्याला सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी अनुमोदन दिले. श्री. जठार यांनी या ठरावांचे महत्व, कार्यकर्त्यांचे राजकीय दायित्व आणि निवडणुकांसाठी सज्जता यावर प्रकाश टाकला.
मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक बूथवर करण्याचे ठरवण्यात आले. जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे यांनी शोक प्रस्ताव मांडला. तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस बाबू सुर्वे, युवा शहरध्यक्ष विक्रम जैन यांनी, राजू तोडणकर यांच्यासमवेत सर्व नगरसेवक जिल्हा पदाधिकारी सभेला उपस्थित होते.
अॅड. पटवर्धन यांचा सत्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनताभिमुख कार्य कर्तृत्वाबद्दल अभिनंदन प्रस्ताव जिल्हा चिटणीस विजय सालीम यांनी मांडला. युवा प्रतिनिधी योगेश हळदवणेकर यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. रत्नागिरी जिल्हा बँकेवर संचालकपदी निवडून असलेल्या भाजपाच्या सदस्यांचे अभिनंदन करण्याचा आणि केंद्रीय नेते विनोद तावडे यांची भाजपा केंद्रीय महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव पारित केला. याप्रसंगी संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार प्रमोद जठार यांनी केला.