( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चित्रकार कलाकृती रेखाटताना आणि त्यात रंग भरताना स्वतःचे अंतर्मन ओतत असतो , म्हणून कलाकृती बोलकी आणि विलोभनीय होते .मी कोकणच्या मातीतील कलाकार आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो . पैसा फंड कलादालनात पहायला मिळालेल्या कलाकृती अंतर्मुख व्हायला लावतात . येथे उत्तमोत्तम कलाकार घडत आहेत ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे , असे प्रतिपादन अभिनेता अंशुमन विचारे यांनी केले .
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील कलादालन पहाण्यासाठी आज अभिनेता अंशुमन विचारे याने प्रशालेला भेट दिली. यावेळी तो बोलत होता . यावेळी त्याच्या सोबत काका श्री. विचारे, प्रख्यात प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे , कलांगणचे तेजस संसारे , संस्था सचिव धनंजय शेट्ये , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते . प्रशालेच्या कलाविभागातर्फे अंशुमन विचारेसह सर्वांचे स्वागत करण्यात आले .
पैसा फंड प्रशालेत आल्यानंतर येथील रंगमंच पाहून आपल्याला भरुन आले. या रंगमंचावर अनेक नाटकातून आपण भूमिका साकारल्याची येथे आल्यावर आपल्याला प्रकर्षाने जाणीव झाली , असे अंशुमनने सांगितले . कला या विषयासाठी पैसा फंड प्रशाला जी मेहनत घेत आहे त्याला तोड नाही असे स्पष्ट करुन येथील विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी भविष्यात आपण नक्कीच एकादी कार्यशाळा घेऊ असे आश्वासन अंशुमन याने यावेळी संस्था सचिव धनंजय शेट्ये यांना दिले. येथील चित्रे आणि शिल्पे अद्भुत असून कोकणात आल्यावर प्रत्येकाने पैसा फंड कलादालन आवर्जून पहावे असे आवाहनही अंशुमन याने केले .
येथील कलाकृतींची तपशीलवार माहिती घेऊन अंशुमनने प्रत्येक चित्रात असणाऱ्या वैशिष्ट्यांबाबत जिज्ञासा व्यक्त करत चित्र देखील समजून घेतली . कोकणच्या ग्रामीण भागात इतके सुंदर कलाकार दडलेले आपल्याला पैसा फंड कलादालनात पहायला मिळाले . या कलाकारांसाठी काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असा उपक्रम आपण नक्कीच हाती घेऊ असे अभिवचनही अंशुमनने यावेळी दिले . चित्रकार विष्णू परीट यांनी जलरंगात रेखाटलेले एक चित्र आणि शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून अभिनेता अंशुमन विचारेचा पैसा फंड कला विभागाच्या वतीने संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अंशुमनने प्रशालेतील विद्यार्थ्यांजवळही संवाद साधला.