(मुंबई)
केंद्र सरकारची आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संयुक्त कार्ड वाटप गतीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी दिले. केंद्रीय आरोग्य सचिव श्री. पंत यांनी आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना निर्देश दिले.
बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, राज्य आरोग्य विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त संचालक नितीन अंबाडेकर, स्वप्निल लाळे, सहसंचालक विजय कंदेवाड, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढील वर्षी नियोजित पीआयपीचे (प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लॅन) प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना देत आरोग्य सचिव श्री. पंत म्हणाले की, पीआयपी व पीएम अभिम अंतर्गत जास्तीत जास्त निधी खर्च करावा. दर्जेदार काम आरोग्य क्षेत्रात उभारावे. जेवढा जास्त खर्च कराल, तेवढा निधी केंद्र शासनाकडून मिळेल. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी. बैठकीत आयुष्मान भव मोहीम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच राज्य शासनाचे विविध निर्णय, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देण्यात येणारा निधी व झालेला खर्च, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, वैद्यकीय शिक्षण विभागाचे निर्णय आदींचाही आढावा घेण्यात आला.