(नवी दिल्ली)
आयुष्मान भारत योजनेच्या अहवालात कॅगने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यानुसार जवळपास ७.५ लाख लाभार्थ्यांनी एकाच मोबाईल नंबरवरून नोंदणी केल्याचे समोर आले आहे. या मोबाईल क्रमांकाचे दहाच्या दहा अंक हे ९ आहेत. म्हणजेच हा मोबाईल क्रमांक (९९९९९९९९९९) असा आहे. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेच्या लेखापरीक्षणाच्या अहवालात कॅगने ही धक्कादायक माहिती दिली.
ज्या मोबाईल क्रमांकावरून सुमारे ७.५ लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली, तो मोबाईल क्रमांकच चुकीचा असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मोबाईल क्रमांकाचे कोणतेही सीमकार्ड नाही. दरम्यान अशाच आणखी एका प्रकाराचा खुलासा कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात सुमारे १ लाख ३९ हजार ३०० लोकांनी ८८८८८८८८८८ या क्रमांवरून नोंदणी केली तर ९६,०४६ लोकांनी ९००००००० या क्रमांकावरुन नोंदणी केली. याशिवाय असे चुकीचे २० क्रमांकदेखील या अहवालातून समोर आले आहेत. या क्रमांकावरुन जवळपास १० हजार ते ५० हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली. कॅगच्या अहवालात एकूण ७.८७ कोटी लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी नोव्हेंबर २०२२ पर्यंत या योजनेत १०.७४ कोटी कुटुंबाना समाविष्ट करण्याच्या लक्ष्यच्या ७३ टक्के आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने या ऑडिटला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या समस्येचे लवकरच निवारण करण्यात येणार आहे. त्यासाठी बीआयएस २.० ही कार्यप्रणाली तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे एकाच मोबाईल नंबरवरुन ठराविक संख्येपेक्षा जास्त कुटुंबांची नोंदणी करता येणार नाही. तसेच कोणताही मोबाईल क्रमांक वापरुन या योजनेसाठी नोंदणी आता करता येणार नसल्याचे कॅगच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.
मोबाईल क्रमांक नसल्याने अडचण
कोणत्याही लाभार्थ्याविषयी माहिती करून घेण्यासाठी मोबाईल क्रमांक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मोबाईल क्रमांकच चुकीचा असल्याने लाभार्थ्याची ओळख पटवणे कठीण असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णालये त्यांना सुविधा नाकारतील आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली.