(मुंबई)
सध्या कोकणात रिफायनरी व्हावी की नाही यावर बरेच वाद होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल वानखेडे स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात सुरू असलेल्या सामन्या दरम्यान “एकच जिद्द रिफायनरी रद्द”च्या घोषणा देण्यात आल्या.
रिफायनरीसाठी सौदी अरेबियाची मोठी कंपनी असलेल्या आरामकोचा मोठा सहभाग आहे. आणि ही आरामको कंपनी आयपीएलची प्रायोजक आहे. यामुळेच “आरामको गो बॅक” च्या घोषणाही देण्यात आल्या. या विरोधा दरम्यान त्यांनी टी शर्ट फडकवला आहे. सामन्यात रिफायनरी विरोधी बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील आणि अन्य कोकणी तरुणांनी IPL मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप चे प्रायोजक असलेल्या सौदीच्या आरामको कंपनी जी कोकणात प्रस्तावित होऊ पाहणाऱ्या रिफायनरी प्रकल्पात 50 टक्के भागीदार आहे, तिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या कार्यकर्त्यांनी Aramco Go Back, एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा ,कोकण वाचवा अशी जोरदार घोषणाबाजी केली.
या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, IPL सामने सुरू असताना हा आम्ही कंपनीला विरोध दाखवून दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी उभारण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत. असं असताना गेल्या महिन्यात रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी विराट मोर्चा काढून हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. दरम्यान शहरातील कोदवली नदीतील खर्लीपात्र ते तहसीलदार कार्यालय मोर्चा काढण्यात आला होता. ‘जमीन आमच्या हक्काची..नाही कुणाच्या बापाची’, ‘एकच जिद्द …रिफायनरी रद्द’, अशी जोरदार घोषणाबाजी मोर्चेकऱ्यानी दिली होती. ‘कोकण आहे ऑक्सिजनचे भांडार, येथे नको रिफायनरीचा बाजार’, असे फलक घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरले होते.
बारसू-सोलगाव-धोपेश्वर पंचक्रोशीमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये, अशी मागणी यावेळी केली होती. त्यानंतर आता आयपीलमध्येही रिफायनरी रद्दचा घोषणा देण्यात आल्याने साऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा रिफायनरीकडे वळले आहे.