(मुंबई)
आयपीएल 2023 चा पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला असून या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केला आहे. गुजरातने हा सामना 5 विकेट्सने जिंकला असून यासोबतच आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये विजयी सलामी दिली आहे. शुभमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १६व्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ विकेट गमावत १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.२ षटकांत ५ बाद १८२ धावा करत सामना जिंकला.
शेवटच्या तीन षटकात गुजरातला ३० धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत सामना रोमांचक वळणावर आला होता. राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शानदार खेळ दाखवत चेन्नईचा विजय हिरावून घेतला. तेवतियाने नाबाद १५ धावांची खेळी खेळली आणि रशीदने १० धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने २७ आणि ऋद्धिमान साहाने २५ धावा केल्या. सीएसकेकडून राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक ३ बळी घेतले.
चेन्नई-गुजरात यांच्यातील या सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उद्धाटन सोहळ्यात अरिजित सिंग, रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया या स्टार्सनी उद्घाटन सोहळ्यात आपली कला सादर केली.
चेन्नईचा डाव
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या.
चेन्नईने फलंदाजी करताना 20 षटकात 178 धावा करून गुजरातला179 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पार करण्यासाठी शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा हे दोघे सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले. परंतु चौथ्या षटकात वृद्धिमान साहा 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने गुजरात संघाची बाजू सावरली. त्याने 36 चेंडूत 63 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीचा शिकार झाला आणि त्याला केवळ 8 धावा करून माघारी फिरावे लागले. सामना चेन्नईकडे झुकतो असे वाटत असताना गुजरातचा फलंदाज राहुल तेवाटीयाने जबरदस्त खेळी करून संघाला सामना जिंकून दिला.
गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.