(मुंबई)
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. आम्ही इथं एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आलो, तर हुतात्म्यांना काय तोंड दाखवायचे? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव होता. मुंबईसाठी हुतात्म्यांचे बलिदान आहे. मुंबईवर सातत्याने हल्ले करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, प्रकल्प पळवून नेले जात आहेत. मराठी माणसाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केलात आहे. मुंबई महाराष्ट्रात राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आम्ही मुंबईला धक्का लागू देणार नाही, मुंबई ही भांडवलदारांची बटीक करण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
तसेच संजय राऊत बेळगावात बोलताना म्हणाले की, बेळगावात येऊन एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करणे म्हणजे सीमभागाचा दावा कमी करण्याचा प्रकार आहे. भाजपचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही. भाजपच्या यापूर्वीच्या नेत्यांनी सीमाभागात येऊन प्रचार केला नाही. सीमाभागातील लोक दहशतीखाली आहेत. राऊत पुढे म्हणाले की, भाजपकडून गेल्या सात आठ वर्षांमध्ये मुद्दामून विष पेरले जात आहे. सीमाभागातील लोक दहशतीखाली आहेत. महाराष्ट्रातील लोक इथं येऊन बोलत असतील, तर त्यांच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.भाजप कोणालाही सत्तेसाठी सोबत घ्यायला तयार असतो. त्यांनी मेहबुबा मुफ्तीला घेतले, मिंधे गटाला सोबत घेतले तर ते कोणालाही घेऊ शकतात. एकीकरण समितीच्या विरोधात महाराष्ट्रातून जे येतील त्या प्रत्येकाचा निषेध करा काँग्रेसलाही काळे झेंडे दाखवा, असेही राऊत म्हणाले.