(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील ग्रामस्थांची गुहागर तालुका प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या सोबत शुक्रवार दि. १७.११.२०२३ रोजी ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिर येथे गावात शेतकर्यांना त्रास देणाऱ्या आणि शेती बागायतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडे आणि उपद्रवी वन्य पशूं बाबत चर्चा व उपाय योजना संदर्भात बैठक झाली.
तत्पूर्वी दि. ७.११.२०२३ रोजी उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी चिपळूण-गुहागर विभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी राजेश्री कीर मॅडम यांना पत्राद्वारे वानर आणि माकडे पकडण्यासाठी पिंजरे किंवा फिरती वॅन मिळण्यासाठी मागणी केलेली होती. त्यानुसार चौकशीसाठी ग्रामस्थ शेतकर्यांसोबत गुहागर तालुका प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर बैठकीत मौजे उमराठ ग्रामस्थांच्या शेती पिकांचे व बागायतींचे वानर, माकडे व रानडुक्कर या उपद्रवी वन्य प्राण्यांपासून नुकसान होत असलेबाबतच्या तक्रारीची चौकशी करून वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसानीची भरपाईबाबत व त्या संबंधीचे शासन निर्णय याची माहिती वन अधिकारी संजय दुडगे यांनी ग्रामस्थांना दिली.
सदर बैठकीत उमराठच्या ग्रामस्थांनी व्यथा मांडताना सांगितले की, आमच्या उमराठ गावामध्ये व परिसरात वानर, माकडे व रानडुक्कर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. नासधूस करत आहेत. परंतु सदरची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणी येतात, पंचनामा वेळेवर होत नाही, वेळ वाया जातो. नुकसान भरपाई मिळालीच तरी ती तुटपुंजी असते. त्यामुळे शासनाने शेतीपिकांचे नुकसान भरपाई देण्यापेक्षा नुकसान करणारे उपद्रवी वन्यप्राणी वानर, माकडे आणि रानडुक्कर या प्राण्यांचा शासनाने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
यामध्ये वानर, माकडे यांना पकडून नसबंदी करणे, पिंजरे किंवा फिरते व्हॅन लावून त्यांना पकडून शासनाचे मार्फत अभयारण्यामध्ये सोडणे किंवा शासनाने शेतकऱ्यांना परवानेसहीत बंदुका देऊन वानर, माकडांना मारण्यासाठी परवानगी देणे असे उपाय सुद्धा सुचवण्यात आले. ग्रामस्थ शेतकर्यांच्या या एकमुखी मागणीवर शासनाने गांभीर्याने लवकरात-लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना वानर माकडे व रानडुक्कर यांच्याकडून होणाऱ्या नुकसानी पासून वाचविण्यात यावे अशी विनंती उमराठ ग्रामस्थ शेतकर्यांच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.