(नागपूर)
हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे, पण त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांनी वातावरण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. दिल्लीत गेल्यावर आम्हाला कटपुतली म्हणतात, मात्र ज्यांना नाक खाजवायला मॅडमची परवानगी घ्यावी लागते, त्यांनी आमच्यावर आरोप आणि स्वाभिमानाची भाषा करु नये, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्लीवारीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले. यांना नाक खाजवायलाही मॅडमची परवानगी लागते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आम्ही दिल्लीत जातो, निधी आणतो. मागील अडीच वर्षात अहंकारामुळेच राज्याचं नुकसान झालं. अनेक प्रकल्प बंद पाडले. आमचं सरकार आल्यानंतर मेट्रो, आरे,समृद्धी सगळे प्रकल्प मार्गी लागले असे त्यांनी सागितले.
केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला, मागितल्या काही शिवाय मिळत नाही. प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. तुमच्यासारखं कडकसिंग बनून चालत नाही. तुम्ही विकासाच्या बाता करता, पण लोकं सुज्ञ आहेत. आमच्या दोऱ्या मतदारांच्या हातात आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मोदींचा करिश्मा संपला म्हणणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे.नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीततीन राज्यात भाजपचे सरकार आल्याने २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.