(मुंबई)
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. मंत्रालयात सुरक्षेवर असलेल्या पोलीस शिपायाला त्यांनी शुक्रवारी सकाळी शिवीगाळ केली. हे प्रकरण त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयीन सुरक्षा रक्षकाला केलेल्या दमदाटीचा अहवाल गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी बांगर मंत्रालयात आले. त्यांच्यासोबत २०-२५ समर्थक होते. तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना एवढ्या लोकांना पत्राशिवाय प्रवेश देता येणार नाही, असे सांगितले. प्रवेश रोखल्याने संतापलेल्या बांगर यांनी या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, “माझ्याकडे पिस्तूल असते, तर तुम्हाला गोळ्या घातल्या असत्या” अशी धमकीची भाषा त्यांनी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने मंत्रालय पोलीस नियंत्रण कक्षाच्या दैनंदिन डायरीमध्ये नोंद केली आहे. या नोंदीचे पडसाद दिवसभर मंत्रालयात उमटले. या प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी तातडीने संबंधित अधिकारी आणि त्यांच्या गटाचे काही आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
या प्रकरणाचा अहवाल गृह खात्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता बांगर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात सुरक्षेवर असलेल्या ज्या पोलीस कर्मचाऱ्याला बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, तो पोलीस कर्मचारी माजी सैनिक असल्याचे समजते.
कोणतीही शिवीगाळ केली नाही
दरम्यान, आपण कोणत्याही पोलिसाला शिवीगाळ केली नसल्याचे बांगर यांनी सांगितले. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा गैरसमज झाला असल्याचे ते म्हणाले. पोलिसांना मी आमदार असल्याचे सांगितले. त्यानंतर माझ्या स्वीय सहाय्यकाने सर्व कार्यकत्यांची प्रवेशद्वारावर नोंद केली. त्यानंतरच आम्ही मंत्रालयात प्रवेश केला, असा खुलासा संतोष बांगर यांनी केला आहे.