विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव चितोड येथील जमावास चिथावणीखोर भाषा वापरून अनुसूचित जाती / जमातीच्या नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला असून अन्य जाती धर्माच्या जमावाकडून कोणताही धोका होणार नाही. याची दक्षता घेण्याबरोबरच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती जमाती प्रदेश समन्वयक व कोकण विभाग प्रभारी सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकरिता येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे नुकतेच निवेदन दिले आहे.
यानुसार बुलढाणा खामगाव चितोड येथील अनुसूचित जाती- जमातीच्या ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या आधारे दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी दलित समाज एकवटल्यानंतर खामगाव चितोड या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी तेथील इतर समाज एकत्र करून अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांविरुद्ध इतर समाजाची माथी भडकवून चिथावणीखोर भाषा वापरून संबधित विषयासंदर्भात तेथील अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांवर गुन्हे दाखल करा अशी चिथावणीखोर भाषा वापरून तेथील सर्व जाती – धर्मामध्ये तेढ निर्माण करून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे . त्याचप्रमाणे दलितांविरुद्ध खोटे चोरीचे गुन्हे दाखल करा, म्हणजे ते अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेतील असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी तेथील नागरिकांना केले आहे. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व अनुसूचित जाती – जमातीच्या नागरिक व इतर सर्व धर्माच्या नागरिकांमध्ये सामाजिक तेढ निर्माण झालेली आहे . त्यामुळे संजय गायकवाड यांच्या चिथावणीखोर भाषेमुळे दलित समाजावर अन्याय व अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी आ. संजय गायकवाड यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अनुसूचित जाती कमिटी मार्फत आग्रही मागणी करण्यात येत आहे.
तरी अनुसूचित जाती- जमातीच्या नागरिकांना प्रशासनाकडून पोलीस संरक्षण देण्यात यावे. जेणेकरून त्यांच्यावर इतर जाती धर्माच्या जमावाकडून कोणताही धोका निर्माण होणार नाही . व त्याचप्रमाणे अनुसूचित जाती – जमातीच्या नागरिकांवर कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत , अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अनुसूचित जाती कमिटीमार्फत प्रदेश समन्वयक व प्रभारी कोकण विभाग सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सुनिलभाऊ सावर्डेकर यांच्यासह काँग्रेस अ.जा.कमिटी चिपळूण तालुकाध्यक्ष सुर्यकांत चिपळूणकर, मधुशेठ सावर्डेकर, भगवान कदम, संतोष देवळेकर आदी उपस्थित होते.