(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पंचायत समिती संगमेश्वरने यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
पंचायत समितीने लोकाभिमुख काम करून चांगला आदर्श घडविला. याचीच पोचपावती म्हणून कोकण विभागामध्ये ही पंचायत समिती प्रथम क्रमांकावर निवडली गेली. याची दखल घेत चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी पंचायत समितीला भेट दिली.
यामध्ये गटविकास अधिकारी भरत चौगले, सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे व सर्व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. अशाच प्रकारची प्रगती पंचायत समितीने करत राहावी, आमदार म्हणून आपण सदैव पाठीशी उभे राहू.
तालुक्याच्या विकासासाठी निधी देऊ, अशी ग्वाही आ. निकम यांनी यावेळी दिली. तसेच चांगल्या कारभाराच्या पंचायत समितीच्या पुढील वाटचालीला निकम यांनी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.