(चिपळूण)
टेरव ग्रा.पं.च्या गैरव्यवहार प्रकरणी टेरव ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेले साखळी उपोषण आणि शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांचे बेमुदत उपोषण आ. भास्कर जाधव यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले. आ. जाधव यांनी सावंत यांना सरबत देऊन या उपोषणाची समाप्ती केली.
द्विसदस्यीय समितीकडून या प्रकरणात चौकशी होणार असल्याचे आश्वासन आ. जाधव यांनी दिले. अखेर संदीप सावंत यांनीदेखील आ. जाधव यांचा शब्द पाळून उपोषण मागे घेतले आहे. या उपोषणाला आ. शेखर निकम यांनीदेखील दोनवेळा भेट देत सावंत यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र, त्यात यश आले नव्हते.
टेरव येथील ग्रा. पं. च्या गैरव्यवहारप्रकरणी येथील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी साखळी उपोषण सुरू केले होते. येथील जलजीवन मिशन योजनेबाबत ग्रामस्थांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. या संदर्भात चौकशीदेखील पूर्ण झाली आहे. त्याचा प्राथमिक अहवाल जि. प. ला सादर झाला असून आता द्विसदस्यीय समिती नेमून अन्य तक्रारींची देखील चौकशी होणार आहे. याबाबत दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत ही चौकशी होईल आणि हा अहवाल जि. प. ला सादर करण्यात येईल.
गेल्या पाच दिवसांपासून या प्रकरणी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यातील दोन सदस्यांची तब्येत गुरुवारी रात्री खालावल्याने त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संदीप सावंत हे आपल्या उपोषणावर ठाम होते. या प्रकरणी फेरचौकशी करण्यासाठी संगमेश्वरचे गटविकास अधिकारी व लांजातील बांधकामचे उपअभियंता ही द्विसदस्यीय समिती चौकशी करणार आहे.
हा अहवाल २९ सप्टेंबरपूर्वी जि. प. ला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आ. जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी चिपळूण पं. स. समोरील उपोषणस्थळी भेट देत संदीप सावंत यांच्याशी संवाद साधला. उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने, तसेच टेरव ग्रामस्थ उपस्थित होते.