(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील ड्राईव्ह-इन लॉन्स, धामणी येथे रविवार, दि. १० डिसेंबर रोजी कोकण-ठाणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार, विधान परिषद सदस्य ऍड. निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक विभागातील एकूण ८० शाळा व २ वाचनालयांना आवश्यकतेनुसार संगणक संच व ओव्हरहेड प्रोजेक्टरचे वितरण करण्यात आले. रत्नागिरीतील शाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी पुढे येतात मात्र त्यांना शालेय वयातच संगणक व प्रोजेक्टर आदींच्या वापराची सवय व्हावी; शालेय कामकाजात सरलता यावी या उद्देशाने आमदार फंडातून या साहित्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आला आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “आ. निरंजनजी डावखरे यांनी या निधीचा वापर राजकीय हेतूने करण्याऐवजी ज्या क्षेत्रासाठी त्याची जास्त आवश्यकता आहे त्याचसाठी वापरला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे आज ज्या शाळांना या निधीचा लाभ मिळाला आहे त्यांची नैतिक जबाबदारी वाढली आहे. तर ज्यांना यावेळी लाभ मिळाला नाही त्यांना तो मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.”
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव म्हणाल्या, “राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेतील ज्या शाळांना आज साहित्य वितरण होत आहे त्यांचे अभिनंदन. आजच्या काळात संगणक प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शाळांची आवश्यकता ओळखून आ. निरंजनजी डावखरे साहेबांनी दिलेली सहृदय भेट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोकणातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना यामुळे नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे.”
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षकवृंदाचे कौतुक करताना, “राष्ट्रप्रेमाचे धडे शाळेतून मिळतात. विजीगिषु वृत्तीची जोपासना शाळेमध्येच होते. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे शक्य होते ते आदरणीय शिक्षक भारतीय संस्कृतीत वंदनीय आहेत.” असे म्हणत त्यांच्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. “शिक्षकप्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक नेहमीच भविष्याचा वेध घेतात. त्यांना अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी राजकीय क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींवर असते आणि आज भाजपा नेते आ. ऍड. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून आम्हाला ही संधी लाभली आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.” असे ते म्हणाले.
यावेळी आ. ऍड. निरंजन डावखरे यांचे प्रतिनिधी अजितकुमार पांडव, रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, रत्नागिरी (उ.) जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू, जिल्हा चिटणीस मधुकर निमकर, जिल्हा निमंत्रीत सदस्य वैशाली निमकर, रत्नागिरी (द.) चिटणीस सौ. कोमल रहाटे, राकेश जाधव, संगमेश्वर (उ.) तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, मिथुन निकम, उपाध्यक्ष शैलेंद्र धामणस्कर, प्रशांत राजवाडे, आय.टी. सेल संयोजक मयुर निकम, संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष रूपेश कदम, सरचिटणीस सचिन बांडागळे, चिपळूणचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, सरचिटणीस विराज हरमाले, शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, देवरुखचे शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, संगमेश्वर (उ.) महिला मोर्चा अध्यक्षा सौ. शीतल दिंडे, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील सुर्वे, सुधीर यशवंतराव, सोशल मिडिया संयोजक चिपळूण तालुका मंदार कदम राहुल फाटक, शुभम पांचाळ यांच्यासह अन्य महिला, युवा पदाधिकारी, कार्यकर्ते व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.