(रत्नागिरी)
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, ढोलताशांचा नाद, फुलांनी सजवलेल्या माळा आणि गणेशभक्तांचे उत्साहित चेहरे अशा भक्तिमय वातावरणात गणेशचतुर्थी पूर्वीच गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी नेले. सध्या पावसाचे वातावरण असल्याने गणेभक्तांची मोठी लगबग दिसून येत आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि पावसाचे विघ्न टाळण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी सोमवारीच वाजत गाजत बाप्पाची मूर्ती घरी आणली. गणरायाच्या पुजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी रत्नागिरी बाजारपेठ गर्दीने फुलले आहेत. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्यांची पाने, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना मागणी आहे. प्रसादासाठी पेढे, मोदक, यांचीही खरेदी सुरू असून, बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे.
रेल्वे, बस आणि खासगी गाड्यांनी चाकरमानी गावोगावी दाखल झाले आहेत. गणरायाच्या आगमनाची लगबग शहरासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे