(मुंबई)
शिवसेना कोणाची यावरून राज्यात सध्या धुमशान सुरु आहे. मूळ शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गट आमने-सामने आले असून आमचाच दसरा मेळावा खरा असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली असून त्यापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेचं संपर्क अभियान सुरु केले आहे. या संपर्क अभियानात बोलताना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तर त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. अतिशय वेगाने ते काम करतात. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या सभांचा भास होतो, असे उद्गार उदय सामंत यांनी काढले आहेत.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या सभेला जी गर्दी होते, ती स्वर्गीय बाळासाहेबांच्या सभेसारखी असते. म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो. कारण एवढी लाखो लोकांची अभूतपूर्व गर्दी सभांना होत आहे, असे म्हणत सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत केली. तसेच आदित्य ठाकरे यांच्या सभेवर नाव न घेता टीका केली.
आमच्याकडे दापोलीला काहीजण सभेसाठी आले होते, एखादा कोपरा पाहायचा, राष्ट्रवादीचे लोक भगवा झेंडा
घेऊन जमवायचे आणि आम्हाला शिव्या द्यायच्या, असे म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या सभेवर टीका केली.