(दापोली / प्रतिनिधी )
दापोली येथे सक्शन पंपाद्वारे अनधिकृत होत असलेल्या वाळू व्यवसाया विरोधात तक्रार केल्याबद्दल येथील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते जहूर अलिमिया कोंडविलकर (अडखळ, ईरफानिया मोहल्ला, दापोली) याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत कोंडविलकर यांनी दापोली पोलिस निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दापोली तालुक्यात ओळखला जातो. अडखळ गावच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू उत्खनन चालते. याबाबत वेळोवेळी शासन दरबारी चोरटी वाळू होत असल्याची तक्रार दिली आहे. याचा मनात राग धरून चोरटी वाळू उत्खनन करणाऱ्या अडखळ गावातील रियान युनस वाकणकर याने बायपासजवळ भर रस्त्यात अडवून मला शिवीगाळ करून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असता मी स्वतःचा बचाव केला. तो वेळोवेळी ठार मारण्याच्या धमक्या देत असतो असे तक्रार अर्जात म्हटले आहे.
दिनांक १२/०६/२०२२ रोजी संध्याकाळी तो दबा धरून बसला होता. ठार मारण्याचे हेतूने अंगावर येवून कोंडविलकर याना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना तक्रारी करतोस ना, तुझा आम्ही गेम केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली. आमचा हात वरीष्ठपर्यंत आहे. आम्ही वाळू माफिया असल्यामुळे सर्व यंत्रणा आमच्याजवळ येण्यासाठी घाबरतात. तू कोण आहेस ? असे उददेशून बोलत होता. त्या ठिकाणी काही अनोळखी लोकानी येवून कोंडविलकर यांना त्याच्या तावडीतून सोडवले.
कोंडविलकर यांनी पुढे तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या जिवाला रियान वाकणकर व इतर वाळू माफियापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. श्री. रियान वाकणकर हा जोगा नदीमध्ये दिवस रात्र चोरटी वाळू सक्शन पंपाच्या माध्यमातून करीत असल्यामुळे मी त्या विरुद्ध आवाज उठवत असल्याने माझा गेम करण्याच्या तयारीत वाळू माफिया आहेत, असे म्हंटले आहे. याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी आणि पोलीस संरक्षण मिळावे असे जहुर अलिमिया कोंडविलकर यांनी तक्रार अर्जात म्हंटले आहे.
फोटो : कोंडविलकर यांनी दिलेल्या चोरट्या वाळूच्या तक्रार अर्जप्रकरणी पंचनामा करण्यासाठी रत्नागिरी येथून खनीकर्म अधिकारी अभिजित शेटे, स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी वडखळ यांचेकडून पंचनामा करण्यात आला.