(मुंबई)
सन २०२४ मध्ये होणा-या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणा-या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचे ठरल्याचे मत शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी व्यक्त केले. ९ मार्च रोजी रात्री महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. ते दिल्लीत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
येणा-या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितले. रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते अशी माहितीही राऊतांनी दिली. या बैठकीत आणखी काही भूमिका ठरल्याचे राऊत म्हणाले.
सध्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे. ही महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. पण आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचे काम राज्य करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. मात्र, आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल असे राऊत म्हणाले.
शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व याबाबत कधीही समझोता करणार नाही असेही राऊत म्हणाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ मदत करावी असी मागणी ठाकरे गट शिवसेनेने केली आहे. त्यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे राऊत म्हणाले. सामान्य माणसाला न्याय मिळावा या हेतूने आमची शिवसेना काम करत असल्याचे राऊतांनी सांगितले.