(नवी दिल्ली)
श्रद्धा वालकर खून प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावालाच्या नार्को चाचणीत आणखी नवी माहिती समोर आली. आफताबने यात अनेक खळबळजनक माहिती दिली असून श्रद्धाच्या खुनाची आधीपासूनच तयारी केल्याचे त्याने कबूल केले. खुनापूर्वी काही जुन्या गुह्यांबद्दल आणि त्याच्या तपासाबद्दल आपण माहिती गोळा केली होती. गुन्हेगारी खटल्यांची सुनावणी कशी चालते, तेही मी पाहिले. जेव्हा पोलीस ताब्यात घेतील, तेव्हा आपण कसे वागायचे, हे शिकण्यासाठी आपण ही माहिती गोळा केल्याचे आफताबने चौकशीत कबुल केले. इतकेच नाही तर जॉन डीपच्या घटस्फोट खटल्यातून तपासाच्या पद्धतीची माहितीही आपण मिळविल्याचे त्याने सांगितले.
आपल्याला श्रद्धाच्या खुनाचा कोणताही पश्चाताप नसल्याचे आफताबने नार्को चाचणीदरम्यान सांगितले. तपासादरम्यान होणा-या प्रश्नोत्तरांसाठी स्वत:ला तयार करत असल्याचेही तो म्हणाला. जॉनी डेप अँबर हर्डच्या घटस्फोट सुनावणी प्रमाणे तपासणीदरम्यान घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळायची हेही जाणून घेतल्याचे त्याने यावेळी सांगितले.
जेव्हा श्रद्धाने आपल्याला सोडून जायची धमकी दिली, त्याचवेळी मी श्रद्धाचा खून करण्याचे ठरविले. तिला मारल्यानंतर मी तीचे शीर लपवून ठेवले आणि नंतर ते टाकून दिले, अशी माहितीही आफताबने दिली. मात्र ते कुठे टाकले हे आठवत नसल्याचे तो यावेळी म्हणाला.
श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने ज्या हत्याराने तिच्या शरीराचे तुकडे केले होते ते हत्यार चिनी बनावटीचे होते. आफताबने ते इंटरनेटवरून मागविले होते. पोलिस आता या हत्याराचा शोध घेत आहेत.