(मुंबई)
मुंबईजवळील कल्याण परिसरातून महाराष्ट्राला हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. चौकशी केल्याच्या रागातून आरपीएफ कॉन्स्टेबलकडून पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कॉन्स्टेबलला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बसवराज गर्ग (वय, ५८) अशी हत्या झालेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. बसवराज गर्ग अंबरनाथ शहरात कार्यरत होते. तर, पंकज यादव (वय, ३५) असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसवराज गर्ग यांनी पंकज यादव यांची एका प्रकरणामध्ये चौकशी केली होती. त्यानंतर पंकज यादव यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. याचाच राग डोक्यात ठेवून पंकज यादवने रेल्वे बॅरेकमध्ये बसवराज गर्ग यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्यात बसवराज यांचा मृत्यू झाला.
पीडित बसवराज हे बुधवारी रात्री १० वाजता कल्याण परिसरातील कोळसेवाडी येथे त्याच्या बॅरेकमध्ये मृतावस्थेत आढळून आले, अशी माहिती कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली. हत्या केल्यानंतर आरोप पंकज पसार झाला होता. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांच्या टीमने तपास सुरू केला. आरोपी पंकज यादव याला पेण येथून कोलशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.