(नवी दिल्ली)
आपला जीव धोक्यात घालून इतरांच्या रक्षणासाठी मदतीला धावणा-या शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा देभरातून ११ मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यात ६ मुले आणि ५ मुलींचा समावेश आहे.
राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांमध्ये आदित्य सुरेश, एम. गौरवी रेड्डी, श्रेया भट्टाचार्जी, संभव मिश्रा, रोहन रामचंद्र बहिर, आदित्य प्रताप सिंह चौहान, ऋषी शिव प्रसन्ना, अनुष्का जॉली, हनाया निसार, कोलागाटला अलाना मिनाक्षी आणि शौर्यजीत रणजीतकुमार खैरे यांना सन्मानित केले जाणार आहे.
या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला बालकांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह दिले आणि त्यांनी मिळवलेल्या यशावर चर्चा केली. मुलांनी पंतप्रधानांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला. आयुष्यात पुढे जाण्यासाठी छोट्या अडचणींवर मात करत सुरूवात करा आणि हळूहळू मानसिक क्षमता वाढवा. यानंतर मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करा, असा कानमंत्र पंतप्रधानांनी मुलांना दिला.
भारत सरकारकडून मुलांना नवोन्मेष, समाजसेवा, शैक्षिणक, क्रीडा, कला, संस्कृती आणि शौर्य या सहा श्रेणींमध्ये त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. प्रत्येक पुरस्कार विजेत्यास पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते.