(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील विविध कार्यालये व शैक्षणिक संस्थाना आपत्कालीन सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र दि.22 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास काही शाळांमधील मुख्याध्यापक धुडकावून लावत असल्याचे दिसत आहेत.
अतिवृष्टीमुळे जीवितास धोका असल्याचे माहीत असुनही काही शिक्षकांना जबरदस्तीने शाळांमध्ये हजर होण्यास सांगितले जात आहे. मात्र कोणत्याही प्रकारे उपस्थिती दिसू नये याची खबरदारीही संबंधितांकडून घेतली जात आहे. यामुळे काही बरे-वाईट झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी केला आहे.
दि.20 ते 22 जुलै दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने सुट्टीचा आदेश दिला आहे. मात्र असे असतानाही, मुले शाळेत नसतानाही शिक्षकांना मात्र बोलविण्यात येते. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच अनेक शिक्षकांच्या संघटनेकडे तक्रारी प्राप्त झाल्याने संघटनेने वरिष्ठांकडे विचारणा केली असता सर्व शाळांना पूर्णतः सुट्टी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असतानाही जर कोणी जबरदस्तीने शिक्षकांचा किंवा जादा तासिकांसाठी मुलांचा जीव धोक्यात घालणार असेल तर ती जबाबदारी सर्वस्वी प्रशाला प्रमुखांची राहील, असे सांगण्यात आले आहे.