(मुंबई)
राज्यातील गोरगरिब जनतेला सणासुदीच्या काळात गोड पदार्थ करता यावेत यासाठी राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ या माध्यमातून काही अन्नपदार्थांचं वाटप अवघ्या १०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. मात्र आता सरकारकडून देण्यात येत असलेल्या या आनंदाचा शिधामधील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामधील तेल निकृष्ट आणि डाळी किडलेल्या आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्या म्हणाल्या की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला ‘आनंदाचा शिधा’ हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
https://www.facebook.com/supriyasule/posts/pfbid0E5HLviaxc66rtwnwJUQBctPtCkbeq88E9a5iEVHBXNrEqTPL95RmaJyMUgvi7ZYil?ref=embed_post