(चिपळूण)
शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण मधील सावर्डे नजीकच्या एका गावात समोर आला आहे. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत दोघांना अटक केली असून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
एका अल्पवयीन मुलीला तुझ्याजवळ मला बोलायचे आहे. त्यासाठी मी मुंबईतून आलो आहे, असे सांगत घरातून बाहेर बोलावून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत तिच्याच गावातील मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या अत्याचारामुळे ती मुलगी गळीतगात्र होताच तिला तेथेच टाकून आरोपीने पोबारा केला होता. मात्र सावर्डे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन चिपळूण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सावर्डे परिसरात हा प्रकार घडला असून खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शनिवार दि. १६ रोजी याबाबत माहिती मिळताच त्या पीडित मुलीच्या मदतीसाठी समाज बांधव जमा झाले व आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा दिलासा पीडितेच्या वडिलांना दिला.
एका दहावीत शिकणा-या अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर परिसरात राहाणाऱ्या, मात्र सध्या मुंबई वास्तव्याला असणाऱ्या एका तरुणाने तिच्या मैत्रिणींकडून मिळवला आणि त्या आधारे तिला तो कायम संपर्क करीत धमकावत होता, सदर पीडित मुलगी त्याचा कॉल टाळत असे. मात्र तरीही सतत कॉल करुन तो तिला हैराण करीत असे. काहीवेळा भीतीपोटी तिने कॉल घेतले, फोनवर तो सातत्याने प्रेम आहे असे सांगत असे, मात्र सदर मुलगी त्याला दाद देत नव्हती. अखेर तिच्यासाठी तो बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी मुंबईतून गावी आला.
त्याने त्या मुलीशी संपर्क केला.
‘मला फक्त तुला एकदा भेटायचे आहे, मी मुंबईहून तुझ्याजवळ बोलायचे आहे म्हणून आलो आहे. मला फक्त एकदाच भेट, अशी गयावया करू लागला होता. तिच्या घराजवळ जाऊन तिला त्याने बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिच्या गावातीलच आपल्या मित्राच्या घरी आणले. जीवाची भीती घालून आरोपी धमकावत असल्याने ती मुलगी मनाविरुद्ध त्याच्यासोबत गेली. तिथे मित्राच्या बंद घरात तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराने ती मुलगी बेशुद्ध पडली, तेव्हा तिला तिथेच टाकून त्या तरुणाने पलायन केले. दीड दोन तासानंतर ती शुद्धीवर आल्यानंतर घरात पोहोचली. भेदरलेल्या व गळीतगात्र झालेल्या आपल्या लेकीला बघून वडील हादरले. तिने घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला. त्यानंतर गुरुवार दि. १४ रोजी सकाळी तिचे नातेवाईक तिला घेऊन सावर्डे पोलीस स्थानकात दाखल झाले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत गायकवाड यांनी आपल्या कर्मचा-यासह त्या आरोपी तरुणांचा सर्वत्र शोध घेतला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, खाजगी गाड्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याची कोंडी करण्यासाठी सापळा रचण्यात आला आणि सापळ्यात आरोपी अलगत सापडला. तत्काळ त्याला अटक करून पोलीस स्थानकात आणले
सदरच्या आरोपी विरोधात भादंवि ३७६ आणि बाल लैगिंग शोषण (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व सपोनि जयवंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वंदना कनोजा करीत आहेत. हा विषय सामाजिक तेढ निर्माण करणारा असल्याने पोलिसांनी अतिशय गांभिर्याने दोन्ही समाजातील नेत्यांशी समन्वय साधून तपासाला गती दिली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईलच, शिवाय या प्रकरणाची कसून तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात गावातील तरुणांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या घटनेचा तपास सावर्डे पोलीस करत हा विषय सामाजिक तेढ निर्माण करणारा असल्याने सामाजिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. यावेळी दोघांनीही आपले मोबाईल नंबर एक्सचेंज केले होते, अशीही माहिती मिळत आहे. आरोपी हा मुंबईमध्ये मंडप डेकोरेटरचे काम करतो. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आणखीन तपास सुरू आहे. पीडित मुलीवर ती सध्या उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्या घरामध्ये हा प्रकार घडला त्या व्यक्तीचा संबंध याच्याशी काही आहे किंवा नाही? याचा तपास सुरू आहे. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळी या घरामध्ये राहणारी व्यक्ती ही खेड इथे क्रिकेट खेळायला गेलेली होती, असे समजते. त्यामुळे या प्रकरणी आणखी तपास केला जाईल. त्यानंतरच आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर सदर गावात संतापाचे वातावरण आहे. गावात शांतता राखण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाचा तपास सावर्डे पोलीस करत आहेत.