(मुंबई)
शिवसेनेत बंड करून नाट्यमय घडामोडींनंतर अस्तिवात आलेले शिंदे-भाजपा सरकार सध्या अनेक कारणांनी चर्चचा विषय बनले आहेत. तर आता शिंदे गट व मनसेची युती होणार अशी चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतलं आहे. ते सुमारे ४० मिनिटे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. यामुळे राजकारणात आणखी काही नाविन्यपूर्ण घडामोडी पहायला मिळणार, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे होते. याशिवाय मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई हेही असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढत असल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.