(रत्नागिरी)
आद्य शंकराचार्य यांनी फक्त ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून चार दिशांना केलेली मठांची स्थापना असे असाधारण कार्य केले. आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य त्यांनी केले. देशभर भ्रमण करून आचार्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व शृंगेरी असे चारही दिशांना मठ स्थापन करून व तेथे अधिकारी पीठाधीशांना नेमून आपल्या तत्त्वज्ञानची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवण्याची व्यवस्था केली, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.
झाडगाव येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी त्यांनी श्री शंकराचार्यांचा सारा जीवनप्रवास उलगडून दाखवला. श्री. पेंडसे म्हणाले की, केरळातील पूर्णा नदीच्या काठावरील कालडी या खेड्यात ब्राह्मण कुळातील वडिल शिवगुरू आणि माता आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचार्यांचा जन्म झाला. अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात शंकराचार्यांनी चार वेळा भारतभ्रमण करून चार पीठांची स्थापना केली. अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार, पुरस्कार करत हेच एकमेव तत्त्वज्ञान असल्याचे सिद्ध केले. वैदिक हिंदू धर्माचे तेज त्यांनी दाखवून दिले. वैदिक हिंदू धर्मातील विविध विचारप्रणालींशी वाद-प्रतिवाद करत अद्वैत तत्त्वज्ञानाने सभा गाजवल्या आणि पुन्हा वैदिक हिंदू धर्म प्रस्थापित केला. हाच खरा शांकर दिग्विजय आहे,
याप्रसंगी संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे आणि कार्यवाह जयराम आठल्ये यांनी श्रीनिवास पेंडसे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी ज्येष्ठ हभप नाना जोशी यांनीही श्री. पेंडसे यांना सन्मानित केले आणि प्रासंगिक मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रतिभा प्रभुदेसाई व्यासपीठावर उपस्थित होत्या. विश्वस्त मंडळ सदस्य डॉ. कल्पना आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. सुरवातीला ब्रह्मवृंदांनी आशिर्वचन सादर केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी श्री शंकराचार्य विरचित स्तोत्र पठण केले. या कार्यक्रमाला शंभरहून अधिक संस्कृतप्रेमी नागरिक, महिला उपस्थित होत्या.