(मानसिक संतुलन – भाग ८)
अनेक वेळा प्रयत्न करूनही जेव्हा यश येत नाही तेव्हा निराशा येणे साहजिकच आहे. असे का होते तेही कळत नाही. त्यासाठी अंतर्मुख होणे हाच एक पर्याय असतो. प्रत्येक समस्येचे उत्तर बाहेर शोधण्याची जणू आपल्याला सवयच लागलेली असते. परंतु समस्या बाहेर नसते. समस्या आपल्या आतच असते. बाह्य जग नेहमी तटस्थ असते. आपल्या इच्छेशिवाय ते आपल्यावर परिणाम करीत नाही. इच्छा नसेल तर बाह्य जगताचा आपल्यावर काडीचाही परिणाम होणार नाही. हिवाळ्यात म्हटले तर थंडी नाहीतर कडाक्याच्या थंडीचाही काही माणसे आनंद घेतांना दिसतात. बाह्य जगताचा आपल्या आत्मिक उन्नतीसाठी फक्त आपण उपयोग करून घ्यायचा असतो. त्याला आपल्या इच्छेनुसार वळवायचा प्रयत्न करायचा नसतो. त्यासाठी योग खूप मदत करतो.
जग आपल्यासाठी आहे. आपण जगासाठी नाही. जगाची गरज आपल्याला आहे आपली गरज जगाला नाही. आपण असलो काय किंवा नसलो काय जगात काहीच फरक पडत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवूनच जगात वावरावे. आपला सर्वांगाने विकास होण्यासाठी ईश्वराने आपल्यासाठी हे जग निर्माण केले आहे. आपल्या सर्वांगीण विकासासाठी ह्या जगातील जे हवे ते घ्या. परंतु त्याचवेळी ह्या जगाला बदलण्याच्या भानगडीत पडू नका. जगाने आपल्या मनाप्रमाणे वागावे अशी भाबडी अपेक्षा करू नये, ते शक्यही नाही.
असे असेल तर अडचण येते कुठे? मुख्य अडचण ही आहे की, ही यंत्रणा समजून घेण्यात आपली गफलत होते. जीवनाचे हेच तत्वज्ञान सुदैवाने लहानपणापासून मिळाले तर उत्तमच! परंतु तसे होणे अगदी दुर्मिळ! सर्व सामान्य माणूस आपले जीवन आपल्या मर्यादित असलेल्या विचारांच्या चौकटीत ओढूनताणून जगत राहतो. आणि त्यातच आनंद शोधायचा प्रयत्न करतो. परंतू ते कसे शक्य आहे? कारण आनंद म्हणजे सहजता! अशी सहजता आपल्या जीवनात आणायची असेल तर आपले जीवनही सहज असायला हवे. त्यात कृतीमता नको.
परंतु आजची स्थिती अगदी उलट आहे. विलासी उपकरणांची घरात रेलचेल दिसते. शरीरास कमीतकमी त्रास होईल यासाठी हा खटाटोप असतो. कृतीम साधन घरी आले की ते त्याच्या सोबत काही दुःखद गोष्टीही घेऊन येते. एखादे साधन जर काही सुखदायक निर्मिती करीत असेल तर त्याला जागा करून द्यावी लागते. त्याचा आवाज सहन करायला लागतो. व इतर मेंटेनन्सचा भारही उचलावा लागतो. कधीकधी त्यातून मिळणाऱ्या सूखापेक्षा त्यास सांभाळण्याचा त्रास अधिक होतो. भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती निर्माण होते. आधुनिकतेचा तोरा मिरवणारे बरेच जण आज ह्या चक्रात अडकलेले दिसतात. त्यामुळे जीवनातील सहजतेला ते मुकतात.
मुख्य प्रश्न असा आहे की, असे कोणते घटक आहेत की ते आपल्या मूलभूत सुखाला पारखे करतात. योग शास्त्रात अशा एकूण पाच गोष्टी सांगितल्याआहेत की त्या आपल्या विकासात मोठा अडथळा निर्माण करतात. शांतीच्या दिशेने जाऊ देत नाहीत. त्यांना योगशास्त्रात ” क्लेश ” हा शब्द आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिन्वेष हे आपल्या आत्मविकासातील पाच मोठे शत्रू आहेत. स्वतःचा विकास करायचा म्हणजे हे पाच शत्रू बाहेर कसे पडतील यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा यांच्याशी लढण्यातच आयुष्य निघून जाते.
या पाच शत्रूंना नीट समजून घेतले की आपले चुकते कुठे? किंवा त्यासाठी काय करावे लागेल हे लक्षात येते. परंतु आपण असा स्वतःबद्दल विचार कधी करीतच नाही. आपल्याला होणारा त्रास हा बाह्य घटकांमुळे होतो आहे असा ठाम विचार करून त्यासाठी उपाय शोधत राहतो. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशी ही अवस्था! यात आपण आपला बराच वेळ वाया घालवतो. शेवटी त्याचे कारण आपल्यातच असल्याने त्याचा शोध कधीच लागत नाही. कायम सुख किंवा शांती कधीच प्राप्त होत नाही.
या पाच शत्रूपैकी पाहिला आणि महत्वाचा शत्रू म्हणजे ‘अविद्या’ होय. बऱ्याच बाह्य घटकांबद्दल आपली चुकीची धारणा असते. वास्तविक तो घटक वेगळा आणि दुःख वेगळे असते. उदाहरणार्थ पैसा! पैशातून आपल्याला सुख मिळते असा सर्वांचा समज असतो. परंतु हे चूक आहे. पैशापासून साधने विकत घेता येतात. ऐवढेच त्यास महत्व आहे. पैशातून धान्य विकत घेता येते. ते धान्य आपली भूक भागवते. म्हणजेच भुकेसाठी धान्य आणि धान्यासाठी पैसा अशी लिंक आहे. जर धान्यापासून माझी भूक भागत असेल तर तर धान्य शेतातून मिळते. मी कष्ट केले तर पैशाशिवाय मला धान्य मिळू शकते. जे पूर्वी मिळत होते. आणि निसर्गही आपल्याला ते देत होता. परंतु अधिक हव्यासापोटी आपल्याला सर्व काही अधिक हवे. आणि ते सारे पैशातून मिळते अशी समज झाली आहे. अधिक सुखाच्या शोधात निघालो आणि दुःखाचा डोंगर घेवून परतलो. अशी आज स्थिती आहे. वास्तविक सुख किंवा शांती ह्या मनाच्या अवस्था आहेत. बाह्य गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध नाही.
कित्येक गोष्टींचे मुल स्वरूपच आपल्याला लक्षात येत नाही. सुंदर कप फुटला म्हणून वाईट वाटते. परंतु तो कप आधी माती होता. आताही तो मातीच झाला. बदलले काहीच नाही. थोड्याशा संस्काराने काही काळापुरते मातीने रुप बदलले. आणि त्यालाच आपण सत्य मानले. अशा अनेक नश्वर गोष्टींना सत्य समजून कवटाळून बसलो आहोत. जन्मापासून मरेपर्यंतचे आपले आयुष्य पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते. आपण इथे एक प्रकारे पाहूनेच आहोत. परंतु तेवढया कालावधीत आपण किती नातीगोती जोडतो. ज्या वस्तू किंवा व्यक्तींशी आपला काहीही संबंध नसतो त्यांना आपण आपले मानतो. त्यांच्याप्रती आसक्ती निर्माण करतो. जसजसे आयुष्य पुढे सरकते हा भ्रमाचा भोपळा हळूहळू फुटू लागतो.
जिथे दुःख, समस्या आहे तिथे अज्ञान आहे. अविद्या नाहीशी झाली की दुःखही नाहीसे होते. अंधुक प्रकाशात सापासारखे काही दिसताच मी घाबरतो. परंतु ब्याटरीच्या उजेडात ती जाड दोरी आहे हे समजताच भीती नाहीशी होते. प्रत्येक वस्तू, किंवा घटनेचे मुल स्वरूप समजले की समस्या नाहीशी होते. मानसिक तणाव निर्माण होण्यामागची कारणे कोणती….
• ज्या वस्तुला आपली समजून जवळ केले ती नश्वर आहे हे मी समजून घेतले नाही.
• ज्या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम केले ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे किंवा माझ्याशिवाय तिचे स्वतंत्र, काही काळापुरते अस्तित्व आहे, काळानुरूप तिचे मन व वर्तन बदलू शकते. हे जीवन सत्य मी समजलो नाही.
• प्रत्येक वस्तू, प्रसंग हे काळानुरूप बदलतात हे माहीत असूनही मी ते कायम असल्यासारखे वर्तन करतो. एक प्रकारे मीच मला फसवत असतो.
• अशी नश्वरता निसर्गाचा नियम असूनही ते असेच रहावे असा निष्फळ प्रयत्न मी शेवटपर्यंत करीत राहतो.
मी माझ्या अस्तित्वामुळे हे जग पाहू शकतो हे न कळून बाह्य जगाला सत्य मानून बदलणाऱ्या जगात काल्पनिक स्थिरतेचे इमले बांधण्याचा प्रयत्न शेवटी मला निराशेच्या खाईत घेऊन जाईल यात कोणते आश्चर्य!
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413