(नवी दिल्ली)
भारतात आता हायड्रोजन पॉवरवर रेल्वे धावणार आहे. हायड्रोजनवर चालणारी ही वंदे मेट्रो ट्रेन पुढील वर्षात सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ही ट्रेन स्वदेशी रुपात डिझाईन आणि निर्माण करण्यात आलेली असून देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन असणार आहे, जी डिसेंबर २०२३ मध्ये धावणार आहे, असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता रेल्वेच्यावतीने वंदे मेट्रो तयार करण्यात येत आहे. सन १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या ट्रेन्सची जागा घेणार आहे. आम्ही वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन तयार करत आहोत, हे डिझाईन मे किंवा जूनपर्यंत तयार होईल. जागतिक स्तरावर आम्ही हे वंदे मेट्रोचे डिझाईन तयार करत आहोत, जी मोठी झेप असेल. या वंदे मेट्रो ट्रेन्सची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे की, देशभरात १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या सर्व ट्रेन्स बदलण्यात येतील, असे वैष्णव यांनी सांगितले.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी वंदे मेट्रो ट्रेन मध्यम वर्ग आणि गरीब वर्गातील लोकांची काळजी घेणारी असेल. याचा फोकस श्रीमंत प्रवाशांसाठी असणार नाही. कारण श्रीमंत लोक आपली व्यवस्था करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार मध्यम आणि खालच्या वर्गातील लोकांवर विशेष ध्यान केंद्रीत करत आहे. जे खर्च करण्यास सक्षम नसतात, असेही वैष्णव यांनी सांगितले.