(मुंबई)
राज्यातील अवैध दारू व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आता खब-यांची मदत घेणार आहे. एखाद्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस ज्या प्रमाणे खब-यांची मदत घेतात त्याच धरतीवर अवैध दारू शोधण्यासाठी खब-यांचे जाळे तयार करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.
मंत्री देसाई म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू धंद्यांची संख्या वाढत असल्याची बाब समोर आली आहे. ७.४ टक्क्यांनी ही वाढ झाल्याचे दिसून आले असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अवैध मद्याची वाहतूक करणा-या चालक, मालक आणि सूत्रधार यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
सध्या राज्यात १२ तपासणी केंद्र अस्तित्वात असून त्यात वाढ करून आणखीन १३ ठिकाणी हे तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सध्या आपल्याकडे ४५ भरारी पथके आहेत. यात वाढ करून १२ नव्या भरारी पथकांची भर पडणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री देसाई यांनी सांगितले.